
महाराष्ट्र राज्यात इयत्ता ५ वी ते १० वी, इयत्ता ८ वी ते १० वी व इयत्ता १ ली ते १० वी वर्गाच्या
काही शासकीय व अनुदानित शाळा सुरू आहेत. ह्या शाळेत प्राथमिक वर्ग सुद्धा समाविष्ट असल्याने
त्यांना RTE-२००९ कायदा लागू आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक
आरटीई-२०१३/प्र.क्र.२०/प्राशि-१, दिनांक ३१ डिसेंबर,२०१३ मधील प्रस्तावनेत स्पष्ट नमूद करण्यात
आले आहे. आरटीई अधिनियमातील कलम ४ अन्वये शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास
वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे नमूद आहे आणि कलम १४ (१) नुसार प्रवेशासाठी वयाचा
पुरावा म्हणून ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतुद आहे.

शासनाच्या असे लक्षात आले आहे की काही कारणांमुळे (उदा. आर्थिक अडचणीमुळे किंवा फीस
न भरल्यामुळे) इयत्ता ९ वी किंवा १० वी च्या एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून T.C.
(Transfer Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) देण्यात आला नसेल
तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानीत माध्यमिक शाळेत सदर दाखल्या अभावी प्रवेश
देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते व त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. आरटीई
अधिनियमातील कलम-५ मधील (२) व (३) नुसार विद्यार्थ्यास एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश
घ्यावयाचा हक्क असेल. साधारण परिस्थितीमध्ये दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेतील शाळा
प्रमुख तात्काळ T.C. (Transfer Certificate) देतात. तथापि, काही कारणामुळे असे प्रमाणपत्र
मिळविण्यास उशीर होत असेल किंवा सदर दाखला नाकारला जात असेल तर दुसऱ्या शाळेत
(शासकीय किंवा अनुदानित) प्रवेश देण्यात उशीर करणे अथवा प्रवेश नाकारणे अन्यायकारक ठरेल.
माध्यमिक शाळा संहितेतील कलम-१८ नुसार एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्या बाबतीत ही
तरतूद स्पष्ट करण्यात आलेली आहे

राज्यातील कोणत्याही शासकीय/महानगरपालिका/नगरपालिका किंवा खाजगी अनुदानित
माध्यमिक शाळेत इयत्ता ९ वी किंवा इयत्ता १० वी वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी
करीत असेल अशा विद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये.
याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देवून पुढील आवश्यक
कार्यवाही करण्यात यावी. पूर्वीच्या शाळेकडून T.C. (Transfer Certificate) प्राप्त न झाल्यास प्रवेशित
होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला
पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येवून इयत्ता १० वी पर्यंन्त वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यात यावा.
प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडीत होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये
याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी / मुख्याध्यापकांनी घ्यावी. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित
शाळेविरूद्ध / मुख्याध्यापका विरूद्ध नियमानुसार / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात
येईल.